Blog Archive

Tuesday, 11 April 2023

चिंच प्रक्रिया उद्योग व त्यासाठी लागणारे बहुपयोगी यंत्रे

 

चिंच प्रक्रिया उद्योग व  त्यासाठी लागणारे बहुपयोगी यंत्रे


प्रास्ताविक :

चिंच हे टॅमरिंडस इंडिका झाडाचे फळ आहे, त्याचा उपयोग खाद्य पदार्थाची चव वाढविणारा घटक किंवा अमचूर सारखा ॲसिड्युलेंट म्हणून केला जातो.चिंच हा कॅसलॅपीनिआसी कुटुंबातील झाड आहे. हे उष्ण कटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशात मोठ्याप्रमाणात वाढते. हिमालय आणि पश्चिम कोरडे प्रदेश वगळता देशातील सर्व राज्यात याची लागवड केली जाते. चिंचेच्या झाडाचा आकार हा मोठा असतो. हा हळू वाढणारा आणि सदाबहार वृक्ष आहे. त्याच्या खोडाचा व्यास १.५ – २ मीटर पर्यंत असतो. तो २०-३० मीटर उंच वाढू शकतो. चिंचेच्या फळांची लांबी साधारणतः ५ ते १४ से.मी. आणि २ सें.मी. रुंद असते. हा एक शेंग प्रकारातील फळ आहे. ज्याला कडक, तपकिरी रंगाचा कवच आहे. फळे पूर्णपणे पिकल्यावर कवच ठिसूळ आणि सहज मोडणारे असते. शेंगामध्ये १ ते १२ मोठे सपाट चकचकीत तपकिरी रंगाच्या बिया असतात.चिंच अलिकडे इंडोनेशिया, तैवान आणि फिलिपिन्समध्ये बोनसाई (कुंड्यामध्ये उगवलेले सजावटीचे झाड किंवा झुडूप कृत्रिमरित्या लहान आकार असलेले झाड) म्हणून लोकप्रिय झाले आहे



चिंचेच्या झाडाचा प्रत्येक भाग, विशेषतः फळ समाजासाठी फायदेशीर आहे. चटणी, लोणचे, केच अप, सॉस, आईस्क्रिम, सरबत आणि लोणच्यामध्ये चिंच फळाचा लगदा महत्वाचा घटक आहे. चिंच ही आयुर्वेद व औषधी प्रणालीमध्ये मोठ्याप्रमाणात वापरली जाते. चिंचेचे पदार्थ हे तापामध्ये शरीर थंड ठेवणारे घटक व औषध म्हणून सर्वत्र ओळखले जातात. चिंचेच्या फळांच्या लगद्याचा उपयोग पाचन, पित्त विकारांवर उपाय म्हणून, उन्हाची झळ, धोत्र्याच्या फुलाची विषबाधा आणि मादक नशा कमी करण्यासाठी केला जातो. चिंचेचे पेय जगभरात लोकप्रिय आहे. मसालेदार चिंचेचे पेय बनविण्याचे सूत्र भारतात विकसित केले गेले आहेत.

चिंचांचा उपयोग :

चिंचांची उत्तम चटणी बनवतात. सॉस व सरबत बनवतात, युरोप, अमेरिकेत चिंचेतील आंबट रसायन वापरून उत्तम आरोग्यदायी पेय बनवितात. कैरीच्या पन्ह्याप्रमाणे चिंचेपासून पन्हे बनवतात. चटकदार भेळ, पाणीपुरी यांसाठी चिंचेचे पाणी वापरतात. याशिवाय अनेक खाद्यपदार्थात चिंचेचा वापर करण्यात येतो. अनेक औषधात चिंचांचा उपयोग करतात. चिंचेची पावडर बनवतात. तिचा उपयोग गोळ्या, बिस्किटे व चॉकलेटमध्ये करतात.

साखर किंवा गूळ मिसळून चिंच खातात. चिंचा वाळल्यावर हाताने सहज सोलल्या जातात. सोलल्यावर बुटुकातून चिंचोका (बी) बाहेर निघतो. तो चवीला तुरट असतो. हा चिंचोका बहुगुणी आहे. त्यात पेक्टिन नावाचे द्रव्य असते. त्याचा जेली व मुरांबा तयार करण्यासाठी उपयोग केला जातो.

चिंचोक्यात पेक्टिन बरोबरच स्टार्च व टॅनिन असते. रानावनात राहणारे आदिवासी चिंचोक्याच्या पिठाची भाकरी करून खातात. तसेच त्या पिठाची खळही बनवितात. चिंचोके भाजून किंवा उकडून खातात. गुरांच्या खड्यात चिंचोक्याच्या पीठाचा वापर करतात. लोकर व रेशीम, इतर धाग्यांचे कापड विणताना चिंचोक्याच्या टरफरलाचा उपयोग केला जातो. घोंगड्यांना खळ देण्यासाठी चिचोक्याच्या टरफलाचा उपयोग केला जातो. घोंगड्यांना खळ देण्यासाठी चिंचोक्यांचा उपयोग केला जातो.

चिंचेचे अनेक औद्योगिक वापरही आहेत. चिंचोके भाजून त्यापासून केलेल्या पिठाचा वापर ब्रेड, बिस्किटामध्येही केला जातो. चिंचोक्याच्या वापर स्टार्च निर्मितीसाठी करतात. स्टार्चचा वापर सुती कापड व घोगड्यांना कडकपणा आणण्यासाठी केला जातो. कातडी कमावण्याच्या उद्योगात चिंचोक्यांच्या काळपट तांबडसर टरफलांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तसेच चिंचेचा पाला जनावरे आवडीने खातात. जनावरांचे खाद्य म्हणूनच याचा वापर केला जातो.

चिंचेचे औषधी गुणधर्म :

चिंचफळातला गर रोचक, दाहशामक व रक्तपित्तशामक असतो. लघवीच्या विकारावर चिंचेच्या टरफलांची राख देतात. फुले रक्तसंग्राहक आहेत. चिंचपन्हे पित्त व इतर ज्वरात होणाऱ्या जुलाबावर देतात. लचक-मुरगळा, व्रण बरा होण्यासाठी त्यावर चिंचपाला ठेचून बांधतात. चिंचपाला सारक, रूचकर व रक्तदोषनाशक असतो. त्यात टार्टरिक अॅसिड व क्षारादी औषधी गुणधर्म असतात. पाळीव जनावरांची पचनक्रिया बिघडली असता त्यास चिंचपाला व लिंबपाला मिश्रित चारा खाऊ घालतात.

गुरांची मान व पाय सुजीवर चिंचपाला व वारूळाची माती उकळत्या पाण्यात कढवून त्याचा लेप करतात. पोटात कळा येत असतील, पातळ जुलाब होत असतील तर भाताच्या पेजेत चिंचपाला वाटून ते मिश्रण औषधासारखे द्यावे. त्याने अतिसार थांबतात, असे वैद्यराज सांगतात. पाल्याच्या रसात तुरटी उगाळून त्यात कापडाची पट्टी भिजवून डोळ्यावर बांधल्यास नेत्रविकास बरा होतो. चिंचेच्या कोवळ्या पानांची चटणी व कोशिंबीर फारच रूचकर लागते. चटणीत चवीला गुळ, हिंग व तिखट किंवा हिरवी मिरची वाटून टाकतात.

चिंचफळातल्या चिंलोक्याचेही अनेक औषधी उपयोग आपल्या प्राचीन ग्रंथपुराणात सांगितले आहेत. भोजनानंतर मुखशुध्दीसाठी चिंचोका वापरतात. भाजलेल्या चिंचोक्याची टरफले काढून सुपारीसारखे चूर्ण किंवा तुकडे, भाजलेल्या खारकांचे तुकडे तसेच मीठ व लिंबयुक्त ओवा टाकतात. ही सुपारी चवदार व पाचक असते. चिंचोके वातहारक, रक्तदोषनिवारक व कफनाशक असतात.साल काढलेल्या, भाजलेल्या चिंचोक्याचे चूर्णामध्ये मध व तूपातून चाटण केल्यास कफ व कफाबरोबर रक्त पडण्याचे थांबते. पडजीभ आल्यास चिंचोका थंड पाण्यात उगाळून त्याचा लेप करतात. चिंचोका चूर्ण व हळद थंड पाण्यात मिसळून घेतल्यास गोवर व कांजिण्यात आराम पडतो. चिंचोके कुटून व यंत्रदाबानं चिंचोक्याचे तेल काढतात. ते शक्तीवर्धक असतं. चिंचपाला, चिंचफळ, चिंचोके व चिंचसाल यांचे अनेक औषधी उपयोग आहेत.


चिंच प्रक्रिया उद्योगासाठी लागणारे बहुपयोगी यंत्रे


1.  चिंचेचे टरफल काढणारे यंत्र (डिहलिंग) : 



चिंचेच्या प्रक्रियेमध्ये टरफल काढण्यासाठी मोठ्या मनुष्यबळाची आवश्यकता भासते. वाळलेल्या चिंचेचे टरफल वेगळे करण्यासाठी यंत्र बाजारात उपलब्ध आहे.

या यंत्राला २६० व्होल्ट इतक्या उर्जेची आवश्यकता असून, ते सिंगल फेज किंवा थ्री फेज अशा दोन्ही स्वरुपात उपलब्ध आहे. वजन सुमारे ६० ते ७० किलो आहे. हे यंत्र एक व्यक्ती चालवू शकते. ४०० किलो प्रति तास क्षमतेच्या यंत्राची किंमत ४० हजार रुपयांपासून पुढे आहे.


2. बिया वेगळे करणारे यंत्र (डिसिडींग):



या यंत्रामध्ये हळू फिरणारे दोन स्टेनलेस स्टीलचे रोलर असतात. एक स्थिर बार (छोटा हातोडा) असतो. चिंच स्टेनलेस स्टीलच्या रोलरमध्ये घातल्यानंतर आतील तीक्ष्ण ब्लेडमुळे उभी कापली जाते. रोलर फिरत असतान त्यावर लावलेला बार दाबला जातो. त्यामुळे चिंचेतील बिया बाहेर टाकल्या जातात. चिंच पुढील बाजूने बाहेर काढली जाते. सुट्या झालेल्या चिंचेच्या बिया काढून बादलीमध्ये साठवल्या जातात. बिया विरहित चिंचा ट्रेमध्ये जमा केल्या जातात.

एक व्यक्ती ताशी ४० ते ५० किलो चिंचाच्या बिया काढू शकतो. या यंत्रासाठी ३ एचपी विद्यूत मोटार लागते. त्यातही सिंगल हेड व डबल हेड असे दोन प्रकार उपलब्ध आहेत. थ्री फेजवर चालणाऱ्या या यंत्रासाठी ४ फूट बाय ४ फूट जागा पुरेशी असून, वजन ८० ते ९० किलो असते.

3. उष्णतारोधक साठवण टाकी (इन्सुलेटेड स्टोरेज टॅंक):




संपूर्णपणे स्टेनलेस स्टिलपासून बनलेल्या या उष्णतारोधक टाकीचे उभे आणि आडवे असे दोन प्रकार आहेत.त्यात दोन थर असून बाह्य वातावरणापासून आतील तापमान कमी किंवा अधिक ठेवता येते. प्रामुख्याने याचा वापर शीतकरणासाठी केला जातो.

या यंत्राची क्षमता १००० लिटर व त्यापेक्षा अधिक असते. त्यानुसार त्याच्या किंमती १ लाख रुपयांपासून पुढे आहेत. साध्या टाक्यांच्या तुलनेमध्ये गराची टिकवणक्षमता यात अधिक असते. प्रत्येक वापराआधी टाकी चांगल्या प्रकारे धुवून घेणे गरजेचे असते

4. चिंचेपासून गर काढणारे यंत्र (पल्पर):


मसाला उद्योगासाठी पेस्ट, साॅस,  ज्यूस, प्युरी अशा प्रक्रिया पदार्थासाठी चिंचेच्या गराची आवश्यकता असते. गर काढण्यासाठी पुर्णपणे स्वयंचलीत यंत्र उपलब्ध आहे. टरफल काढलेली चिंच किचिंत ओलसर करुन फीड हॉपरमध्ये टाकली जाते. आतील फीड रोलर्सच्या साह्याने चिंच फिरवली जाते. ब्लेडने चिंच कापून एकमेकांविरुद्ध दिशेने फिरणाऱ्या दोन रोलर्समध्ये चिंचेचा गर घट्ट दाबला जात एका भांड्यामध्ये जमा होतो. चिंचेच्या बिया व तंतुमय भाग रोलर्समधून पुढील बाजूला ढकलला जातो.

सिंगल फेजवर चालणाऱ्या या यंत्रासाठी १ व ३ एचपी क्षमतेची मोटार लागते.  २२० व्होल्ट ऊर्जेवर चालणाऱ्या यंत्रापासून एका मनुष्याच्या मदतीने प्रति तास १०० ते १५० किलो चिंच गर वेगळा केला जातो. त्याचे वजन ४० ते ५० किलो आहे. क्षमतेनुसार यंत्राची किंमत ७० हजार रुपयांपासून पुढे आहे.



5. गर भरणी यंत्र:




हे यंत्र गर, चटणी, साॅस, जॅम, प्युरी, सीरप, लस्सी, श्रीखंड इ. पदार्थ पाऊच, बाटल्या किंवा कपामध्ये भरण्यासाठी वापरतात. हाॅपरमधून प्युरी न्युमॅटिक प्रेशर फिंलीगकडे पाठवली जाते. तेथे त्यावर दाब दिला जाऊन वजन किंवा आकारमानाप्रमाणे योग्य तेवढा भाग बाटलीमध्ये भरला जातो.

अचूक वजनासाठी यामध्ये स्क्रू स्टाॅप कॅलिब्रेटेड स्केल असते. यात आकारमानानुसार ५० मिली ते १००० मिलीपर्यंत गर किंवा द्रव भरता येतो. याद्वारे एक मिनिटामध्ये १५ बाटल्या भरता येतात. संपुर्ण स्वयंचलीत यंत्राची क्षमता ६०० लिटर प्रति तास असून, वजन ६५ किलो आहे. किंमत ८० हजार रुपयांच्यापुढे आहे.

यात माणसांद्वारे चालवण्याचे यंत्रही उपलब्ध असून, त्याच्या किंमती २० हजार रुपयांपासून पुढे आहे. यंत्राला २३० व्होल्ट ऊर्जा लागते. त्याची दाब रचना ०.४ ते ०.६ एमपीए आहे. याद्वारे आपणास १० मिली पासून ते १००० मिली पर्यंत बाटल्या भरता येतात. यंत्राचे वजन सुमारे ४० किलो आहे.

6. बाष्पीभवन किटली (स्टीम जॅकेटेड कॅटल) :



चिंचेचा गर गरम करण्यासाठी व बाष्पीभवनाद्वारे त्यातील पाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी या यंत्राचा वापर होतो. त्याच प्रमाणे एक समान उष्णता आणि वाफेद्वारे चिचेंचे निर्जंतुकीकरणही केले जात असल्याने गर अधिक काळ टिकतो. या किटलीमध्ये अंतर्गंत भाग आणि बाह्य जॅकेट असे दोन भाग असतात. बाहेरून जोडलेल्या बॉयलरद्वारे आतील पोकळ भागात वाफ सोडली जाते. वाफ नियंत्रित ठेवण्यासाठी प्रेशर गेज आणि सेफ्टी वॉल्व असतात.

किटली ही एसडब्ल्यूजी स्टेनलेस स्टीलपासून बनवलेली असते. या किटल्या आपल्या आवश्यकतेनुसार ५० लिटरपासून १००० लिटर प्रति तास क्षमतेच्या उपलब्ध आहेत. या किटलीला १ एचपी क्षमतेची विद्यूत मोटार जोडलेली असते. २२० होल्ट्स, थ्री फेजवर हे यंत्र चालते. अर्ध स्वयंचलीत यंत्र स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले असते. त्याची किंमत ५० ते ६० हजार रुपयांपासून पुढे आहे.

7. चिंचेची भुकटी करणारे यंत्र  :



विविध मसाले किंवा प्रक्रिया पदार्थांमध्ये चिंचेच्या भुकटीचा वापर केला जातो. यासाठी बिया काढलेली चिंच उन्हामध्ये ८ ते १० दिवस वाळवून, भुकटी करणाऱ्या यंत्राद्वारे दळून घेतली जाते.

हे अर्ध स्वयंचलित पल्व्हरायझर पुर्णपणे स्टेनलेस स्ट्रीलचे बनवले जाते. २४० होल्ट ऊर्जा, सिंगल फेजवर चालणाऱ्या या यंत्राची क्षमता १० ते २५० किलो प्रति तास आहे. या यंत्रासोबत १० किलोची स्टीलची साठवणूक टाकी खालील बाजूला जोडलेली असते. या पल्व्हरायजरची किंमत ३५ हजार रुपये आहे. हे बहुपयोगी यंत्र असून, त्यात चिंच भुकटी सोबत सर्व प्रकारचे मसाले, डाळी, गहू, तांदूळ, बाजरी, मका, नाचणी बारीक करु शकतो.

8.चिंचेचे ठोकळे :



पारंपरिक पद्धतीमध्ये चिंचेचे गोळे बनवून ते साठवले जातात. मात्र, अलिकडे यंत्राच्या साह्याने चिंचेचे साधारण अर्धा किलो वजनाचे ठोकळे बनवले जातात. बिया काढलेल्या या चिंचेच्या ठोकळ्यापासून विविध प्रक्रिया पदार्थ तयार करणे सोपे पडते.  




चिंचेचा ठोकळा बनवणारी यंत्रे स्वयंचलीत व मॅन्युअली अशा दोन्ही प्रकारात उपलब्ध आहेत. यात ५०० ग्रॅम क्षमतेच्या साच्यामध्ये बिया विरहित चिंच टाकली जाते. त्यावर हायड्रॉलिक पद्धतीने दाब टाकला जातो. थ्री फेज, २२० ते २४० व्होल्टवर चालणाऱ्या यंत्राची क्षमता ताशी २०० किलो आहे. यामध्ये मनुष्यबळावर चालणारे यंत्रही उपलब्ध आहे


No comments:

Post a Comment

Ten Important Farm Machinery with Uses

  Ten Important Farm Machinery in India with Uses Plough : Tractor Ploughing is the most common and efficient farming practice. Plough is th...