सोनचाफा फुलशेती
सोनचाफा हा चाफ्याचा भारतीय प्रकार भारतात हिमालयापासून तामिळनाडू आणि सह्याद्रीपासून पूर्वेकडील सर्व राज्यांत दिसून येतो. या वृक्षाचे शास्त्रीय नाव मिकेलिया चंपका (Michelia champaca) आहे. कूल मॅग्नोलिएसी. सोनचाफ्याची सोनेरी पिवळ्या रंगाची फुले दाट अशा पर्णसंभारात लपलेली असतात. सुवर्णचंपक या नावानेही हे फूल ओळखले जाते.
रूप, रंग आणि गंध या सगळ्याच बाबतीत फुलांमध्ये तुलना सुरू केली तर सोनचाफा पहिल्या रांगेत आपले मानाचे स्थान राखून असेल यात शंकाच नाही.अनादि काळापासून भारतीय साहित्य आणि आयुर्वेदात सोनचाफ्याचे संदर्भ सापडतात. सोनचाफ्याचा सुगंध अक्षरश: वेड लावतो. रूप आणि रंगदेखील तसाच मनाला वेड लावणारा. पिवळ्याधम्मक केशर किंवा हापूसच्या आंब्याच्या रंगाची ही फुले खूप सुंदर दिसतात. सफेद, फिक्कट पिवळा ते गडद पिवळा अशा वेगवेगळ्या रंगछटांमध्ये सोनचाफ्याची फुले आढळतात.
१० अंश सेल्सियस तापमानापासून ते ३५-४० अंश सेल्सियस तापमानातदेखील सोनचाफ्याचे झाड उत्तम वाढते. त्याची उंची साधारण ५० मीटपर्यंत असू शकते. सदाहरित असल्याने सावलीसाठी तर हा वृक्ष उपयोगी येतोच; परंतु त्याला येणाऱ्या सुगंधी व सुंदर फुलांमुळे घराच्या, शाळेच्या, मंदिराच्या परिसरात तसेच उद्यानात लागवड करताना सोनचाफ्याला झुकते माप मिळते. याची फुले मोठी असून, देठ छोटा असतो. फुले कधीच गुच्छात येत नाहीत. फुलात लहान-मोठय़ा मिळून साधारण १५-२० पाकळ्या असतात.
या फुलांना खूप सुंदर सुगंध येतो. फुले सुकली तरी हा सुगंध बरेच दिवस टिकून राहतो. हार, वेण्यांमध्ये तसेच आरास करण्यासाठी ही फुले वापरली जातात. या फुलांपासून सुगंधी तेल तयार केले जाते. अत्तर, अगरबत्ती, साबण यांमध्ये ते वापरले जाते. शिवाय या तेलाचा पुष्पौषधीमध्येदेखील वापर केला जातो. सोनचाफ्याचा आल्हाददायक सुगंध तणाव दूर करून वातावरण प्रसन्न करतो. या झाडाच्या आसपास हा सुगंध नेहमी दरवळत असतो. सोनचाफ्याची फुले आणि कळ्या औषधी असून ती अनेक रोगविकारांमध्ये वापरली जातात. तापविकारावर ही फुले गुणकारी असून जळजळ, मळमळ यांवरदेखील ती वापरली जातात. याच्या कळ्या काचेच्या बाटलीत भरून त्यात पाणी घालून साठविल्या जातात. त्या वर्षांनुवर्षे टिकतात. शोपीस म्हणून या बाटल्या घरात, कार्यालयात ठेवल्या जातात.
सोनचाफ्याची पाने हिरवी आणि आकाराने मोठी असतात. या पानांपासूनदेखील तेल काढले जाते. पोटात होणारी जळजळ तसेच पोटशूळावर पानांचा रस मधातून दिला जातो. तसेच पानांचा काढा सांधेदुखीवर गुणकारी आहे. याच्या झाडाचे खोड मोठे असून त्याचा रंग काहीसा पांढरट किंवा राखाडी असतो. तापविकारांवर याच्या सालीचे चूर्ण वापरले जाते. तसेच मधुमेहावरदेखील याच्या सालीपासून बनवलेल्या काढय़ाचे प्रयोग केले जातात. सोनचाफ्याची मुळे रेचक असून, पोट साफ होण्यासाठी जी औषधे बनविली जातात त्यात यांचा वापर केला जातो.
याचे लाकूड मजबूत असल्याने त्याचा वापर खेळणी आणि शोभेच्या वस्तू बनविण्यासाठी केला जातो. फूल गळून पडले की याला छोटय़ा छोटय़ा फळांचे घोस येतात. प्रत्येक फळात एक बी असते. याच बियांपासून नवीन रोपे तयार केली जातात. सोनचाफ्याचे कलमदेखील करतात. बियांपासून केलेल्या झाडाला फुले येण्यासाठी साधारण १०-१२ वर्षांचा कालावधी लागतो. पण कलमी झाडाला लवकर फुले येतात. साधारण वर्षभर याला फुले येतात. पण पावसाळ्यात विशेष बहर असतो. कळ्या काढायला सोपे पडावे म्हणून याची वाढ नियंत्रित ठेवली जाते. त्यासाठी त्याची छाटणी करतात. पायांच्या टाचांना ज्या भेगा पडतात त्यासाठी सोनचाफ्याच्या बियांपासून औषध तयार केले जाते. सोनचाफ्याची फुले भगवान विष्णूच्या पूजेत वापरली जातात.
इतर पारंपरिक शेतीबरोबरच आपल्या देशामध्ये फुलशेती बऱ्यापैकी होत आहे. त्यामध्ये गुलाब, जरबेरा, कार्नेशन, शेवंती, मोगरा, जाई-जुई, लिली यांसारख्या फुलांना फुलांच्या बाजारपेठेमध्ये चांगली मागणी असून, आतापर्यंत काहीसे दुर्लक्षित व फुलशेतीमध्ये विशेष लागवड नसलेले सोनचाफ्याचे झाड.
अशा दुर्मिळ सोनचाफ्यांची गुणवैशिष्ट्ये ओळखून त्याची कलमे करून अभिवृद्धी केल्यास अशा जातिवंत कलमांपासून आपणास फुलांचे उत्पादन घेणे शक्य आहे. कलमांची लागवड केली असता अशा झाडांपासून लवकर व झाडांची कमी उंची ठेवून आपणास फुलांचे उत्पादन घेता येते. यापासून आपणास फुले विकून पैसे तर मिळतातच, परंतु चाफ्याच्या सुगंधाने मन उल्हसित राहून ताणतणावांपासून मुक्त राहण्याचा आनंद मिळतो तो वेगळाच.
फुलशेतीसाठी सोनचाफा लावताना त्याची निवड करणे हे फार महत्त्वाचे आहे. सोनचाफ्यामध्ये अनेक प्रकार असून, त्यांना फुले येण्याचा कालावधी वेगवेगळा आहे. यामध्ये प्रकारांबरोबरच फुलांचा रंगही वेगवेगळा असतो. त्यामुळे फुलांच्या बाजारामध्ये दराचा ग्राहकाचा व टिकाऊपणाचा विचार करून सोनचाफ्याची लागवड करावी. यासाठी गडद पिवळा व गडद केशरी किंवा सिमाचल केशरी यांची कलमे लावावीत.सर्वच चाफ्याच्या झाडांची पाने जवळपास एकसारखीच असल्याने त्यांना जातीनुसार ओळखण्याची सुविधा नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेताळ बांबर्डे गावच्या वेलणकरांनी मात्र त्याचा अभ्यास केला, प्रयोग केले, नवनवे प्रकार सर्वांसमोर आणले. सर्व प्रकारच्या सोनचाफ्यांची फुलांसाठी लागवड करून खास सोनचाफ्याचे शेतकरी म्हणून ओळख निर्माण केली आहे
लागवडीचा काळ
पाण्याची बारमाही सोय असल्यास कोणत्याही हंगामामध्ये लागवड करता येते. कलम लावताना खड्डा 60 सेंमी द 60 सेंमी. द 60 सेंमी, असा खणून त्यामध्ये कुजलेले कंपोस्ट खत, गांडूळ खत व शेणखताने अर्धा भरावा. दोन झाडांमधील अंतर 3 मीटर व दोन ओळींमधील अंतर 3 मीटर ठेवावे. कलमाचा डबा अथवा पॉलिथिन बॅग हलकेच काढून मुळांना इजा न करता कलम लावावे. कलमाचा जोड असलेला भाग जमिनीच्या वर ठेवावा, तसेच जोडाजवळ मूळरोपाला येणारे फुटवे वेळोवेळी काढावेत. 3 द 3 मीटर याप्रमाणे लागवड केली असता एका आरला 10 झाडे बसतात. एकरी 400 व हेक्टरी 1000 कलमांची लागवड करता येते.
खते व पाणी व्यवस्थापन
झाडांना वेळोवेळी शेण खत, गांडूळ खत व स्टेरामिल ही खते वाढीनुसार द्यावीत. जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे. पावसाळ्यात कलमे लावलेल्या जागेमध्ये कोठेही पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी.एक वर्षानंतर या कलमांना कळ्या येऊन फुले येऊ लागतात. सुरवातीस हे प्रमाण कमी जास्त असते. दोन वर्षांनंतर झाडांची वाढ जोमदार झाल्यावर प्रत्येक झाडाला सरासरी 15 ते 20 फुले येतातच. फुले येण्याचा कमी जास्त काळ वगळता वर्षातून 180 दिवस फुले मिळतात.
तीन वर्षानंतर झाडे चांगलीच जोमाने वाढून फुलांचे प्रमाण वाढते. झाडे अस्ताव्यस्त वाढून दाट होऊ नये यासाठी त्यांची छाटणी करून झाडे लहान ठेवता येतात. यामुळे फुले काढणे सोयीचे होते.
फुलांची काढणी
सकाळी लवकर फुले काढून ती जवळच्या बाजारामध्ये 3-4 तासातच पाठवावी. उन्हाने व धक्क्याने हे नाजूक फूल कोमेजते. यामुळे काढणी व विक्री या गोष्टी त्वरेने होणे महत्त्वाचे आहे. अशा फुलांना व्यापाऱ्यांकडून शेकडा 30 ते 40 रुपये दर मिळतो. सणासुदीच्या काळामध्ये यापेक्षा जास्त दर मिळतो. मेहनत व मशागतीचा खर्च वजा जाता हेक्टरी वार्षिक एक लाख रुपये तरीउत्पादन मिळते. ही फुले दादर, पुणे, स्थानिक फूलबाजारात विकली जातात.
वर्षभर मागणी
>सोनचाफा आणि जास्वंदीला मुंबईच्या दादर फुलबाजारात वर्षभर मागणी असते.
>सोनचाफ्याला किमान ६० रुपये शेकडा ते कमाल ६०० रुपये शेकडा भाव मिळतो. गणेशोत्सव-नवरात्रात वर्षातला सर्वोच्च दर मिळतो.
>सूर्योदयानंतरच सोनचाफा उमलतो. आधी तोडलेल्या कळ्या उमलत नसल्याने चोरीची भीती नाही.
चार एकरांतून थंडीत पाच-सहा हजार आणि उन्हाळ्यात ३०-३५ हजार फुले मिळतात.
No comments:
Post a Comment