पांढऱ्या जांभळाची शेती
शास्त्रीय माहिती :
शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार पांढऱ्या रंगाच्या जांभळाचे शास्त्रीय नाव ‘सायझिजियम क्युमिनी’ (Syzygium cumini) असे आहे. ‘मिरटशिए’ नावाच्या कुळातील हे जांभूळ रानमेवा प्रकारात मोडते.हे जांभूळ प्रामुख्याने दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियामध्ये आढळते. पांढऱ्या रंगाच्या जांभळाची रोपे ओडिशात मिळतात.
जमिन:
पांढऱ्या जांभळाची झाडे पाण्याचा निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये वाढतात. गायरानाच्या हलक्या व पडिक जमिनीपासून ते सुपीक, मध्यम काळय़ा आणि माळाच्या जमिनीत ही झाडे चांगली वाढतात. . कमी खर्चात, कमी पाण्यात आणि कमी औषधामध्ये हे फळपीक पदरात पडते. फळमाशी आणि खोड अळी हे झाडांचे शत्रू आहेत. त्यापासून झाडाचे संरक्षण करण्यासाठीही जास्त काही करावे लागत नाही.
हवामान:
माफक तापमान असलेले वातावरण ही झाडे वाढायला पोषक ठरते.
औषधी उपयोग
जांभूळ हे तर औषधी गुणधर्मानी युक्त फळ असल्यामुळे त्याचे महत्त्व काही औरच असते. पांढऱ्या रंगाच्या जांभळाचे महत्त्व पारंपरिक जांभळाप्रमाणे आणखी वैशिष्टय़पूर्ण ठरते. आंबट, तुरट, मधूर, रसाळ आणि गरदार अशा या फळामध्ये ‘व्हिटामिन सी’ २२ टक्के तर’’व्हिटामिन ए’ ११ टक्के यासारखे औषधी गुणधर्माचे विविध उपयुक्त घटक आहेत. जांभूळ मधुमेहावर विशेष गुणकारी मानला जातो. जांभळाच्या बियाणांचे चुर्ण मधुमेहावरील उत्तम औषध ठरते. जांभूळ रक्त शुध्द करते. यकृत मजबूत होते. मूत्राशयासारखे आजारही नाहीसे करते. वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी जांभळाच्या पिकलेल्या फळापासून जेली, सिरप व अन्य उपयुक्त पदार्थ तयार करता येतात. जांभूळ पाचक आहे. जांभूळ झाडाची पाने शरीराच्या स्नायूंचे दुखरेपण कमी करण्यास मदत करतात. साधारणपणे १२ मीटर उंचीच्या एका झाडावर ७०० किलोपर्यंत जांभूळ फळे लगडतात.
बाजारपेठ:
कमी खर्चात जांभळाचे पीक घेतले जाते. सध्या जांभळाची हार्वेस्टिंग सुरु आहे. ज्याची मार्केटला किंमत 400 रुपये प्रतिकिलो इतकी आहे. यामुळे त्यांना चांगले उत्पादन मिळणार आहे. पांढऱ्या रंगाच्या जांभळात विविध औषधी गुण आहेत. यामुळे याची मागणी देखील जास्त आहे.या फळाची मागणी दिल्ली बेंगलोर मुंबई पुणे यांसारख्या मेट्रो शहरात मोठ्या प्रमाणात असते. या फळाला इतर जांभळापेक्षा अधिक बाजार भाव प्राप्त होत असतो, या पांढऱ्या जांभळाला सुमारे चारशे रुपये प्रति किलोपर्यंत असा दर मिळत असल्याचे सांगितले जाते.
फळ उपलब्ध
पांढरे जांभूळ हे बाहेरून तसेच आतून देखील पांढऱ्या रंगाचे असून यास बाजारामध्ये आता बऱ्याच प्रमाणात मागणी होत आहे. पारंपरिक जांभळय़ा रंगाचे जांभूळ पावसाळय़ात सुरुवातीला खाण्यासाठी उपलब्ध होतात. परंतु पांढऱ्या रंगाचे जांभूळ त्या अगोदरच म्हणजे उन्हाळय़ात शरीर थंड ठेवण्यासाठी एप्रिलमध्येच चाखायला मिळते.
झाडांचे महत्त्व:
जगात मधुमेही रुग्ण वरचेवर वाढत आहेत. त्यामुळे जांभळाचे महत्त्वही अबाधित राहणार आहे. शेतीकारणाचा विचार करताना शेतात काय पिकते, यापेक्षा बाजारात काय विकते, हे ज्या शेतकऱ्याला कळते, तोच शेतकरी खऱ्या अर्थाने प्रगतशील म्हणून ओळखला जातो, पांढरे जांभूळ शेती शेतकऱ्यांना प्रगतशील म्हणून ओळख निर्माण करून देताना त्यांची आर्थिक पत वाढविण्यासाठी निश्चितच हातभार उचलण्यास नवा आदर्श ठरण्याची अपेक्षा आहे. विशेषत: नैराश्येतील शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा विचार महत्त्वाचा वाटतो.
No comments:
Post a Comment