Blog Archive

Tuesday, 4 April 2023

हवेवरचा गहू

हवेवरचा गहू 


 भारतीय शेतीत काळाच्या ओघात मोठा बदल झाला आहे. शेतकरी आधुनिक शेतीकडे मोठ्या प्रमाणत वळत आहेत. तरीही काही भागात पारंपरिक शेती टिकून आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर हा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. मात्र, खानापूरच्या घाटमाथ्यावर चक्क हवेवरचा गहू पिकवला जातोय. विशेष म्हणजे लागवडीपासून काढणीपर्यंत गव्हाला एकदाही पाणी दिले जात नाही. दूर्मिळ होत चाललेले हे वाण शेतगहू म्हणूनही ओळखले जाते.


खानापूर घाट माथ्यावर 8 ते 10 गावांत मिळून किमान 125 ते 150 एकरात शेत गव्हाचे उत्पन्न घेतले जाते. त्याला 'हवेवरचा गहू' असंही म्हणतात. घाटमाथ्यावरचे हवामान आणि जमिनीच्या ओलसरपणाच्या आधारे हा गहू पिकवला जातो. या भागात गव्हाला पेरणी ते काढणीपर्यंत पाणी दिले जात नाही. या बिनपाण्याच्या गव्हाला शेत गहू किंवा हवेवरचा गहू म्हणतात. खानापूरच्या घाटमाथ्यावरच्या या गव्हाचे वैशिष्ट्य म्हणजे हा केवळ जमिनीत असणाऱ्या ओलीवर येतो. त्यामुळे हा वैशिष्ट्यपूर्ण गहू मानला जातो.



विशेष म्हणजे दुष्काळी, कमी पावसाच्या इतर कुठल्याही पट्ट्यापेक्षा खानापूर घाटमाथ्यावर या गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतात. एक तर या पिकाला मध्यम स्वरुपाची जमीन लागते आणि वातावरण कोरडे असले तरी गारवा आवश्यक असतो. या दोन्ही गोष्टी खानापूर घाटमाथ्यावरील रेणावी , रेवणगाव, घोटीखुर्द, घोटी बुदुक घोडेवाडी, ऐनवाडी, पोसेवाडी, जाधववाडी, तामखडी अडसरवाडी या घाटमाथावरील गावच्या शेतामध्ये मिळतात.


हवेवरचा गहू इतर सर्व गव्हांच्या वाणा पेक्षा हा वेगळा असतो. या शेतगव्हाला बाजार भाव सुद्धा इतर गव्हाच्या तुलनेत जास्तीचा असतो. या गव्हाच्या चपात्या किंवा पोळ्यांचा रंग लालसर असतो. त्या अत्यंत मऊ, स्वादिष्ट आणि पचायला हलक्या तसेच आरोग्यास चांगल्या असतात. याचे बियाणे स्वतंत्रपणे या भागातील शेतकऱ्यांकडे संरक्षित केलेले आहे.


साधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या शेवटाला म्हणजे दसरा झाल्यानंतर या गव्हाची पेरणी केली जाते. त्यानंतर साडेचार ते पाच महिन्यात हे पीक येते. थंडीच्या दिवसातील वातावरण या पिकाला पोषक असते. रब्बी हंगामात जमिनीतल्या ओलीवर येणारा हा गहू आहे. त्यासाठी एकदाही पाणी द्यावे लागत नाही. एकरी 20 किलो गव्हाचे बियाणे लागते. त्यात एरवी 5 ते 6 क्विंटल (कधी कधी 6 ते 7 पोतीसुद्धा) उत्पन्न निघते. हे वाण दुर्मिळ असल्यामुळे सध्या परंपरागत काही लोकांच्याकडेच उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment

Ten Important Farm Machinery with Uses

  Ten Important Farm Machinery in India with Uses Plough : Tractor Ploughing is the most common and efficient farming practice. Plough is th...